श्री देव धूतपापेश्वर मंदिर
पाप धुऊन काढणारा ईश्वर म्हणून श्री देव धूतपापेश्वर प्रसिध्द आहे. हे मंदिर प्राचीन असून 10 व्या आणि 11 व्या शतकातील शिलाहार काळातील असल्याचा अंदाज आहे. हया मंदिरासंबंधी अशी आख्यायिका आहे की राजापूर परिसरात निळोबा भट नावाचा एक गरीब माणूस राहत हेाता. काशीविश्वेश्वर दर्शन आणि गंगास्नान करण्यास हे शिवभक्त दरवर्षी काशीला जात असत. परंतु वृध्दापकाळामुळे पुढे इतक्या दूर जाववेना. त्यांच्याकडे गाय होती. तिने अचानक दूध देणे बंद केल्यामुळे त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. रानात जाऊन एके ठिकाणी ती गाय झाडाखाली पान्हा सोडत असल्याचे त्यांच्या निदर्षनास आले. गायीच्या गुरख्याने त्या ठिकाणी रागातच कु-हाडीचा घाव घातला. त्यावेळी जिथे घावा घातला त्या खडकाचा एक खडपा उडून विशालगडाच्या कासर्डे गावी जाऊन पडला. मूळ खडक त्याच स्थानी राहिला. निळो भटांना त्या खडकात तुटलेले शिवलिंग आढळले. ते आजही स्वयंभू शिवलिंग त्याच अवस्थेत आहे. दररोज रात्री शेवटची महापूजा हेाते आणि देव शंकर- पार्वती यांच्यासाठी सारीपाटाचा खेळ मांडला जातो. गर्भगृहाचा दरवाजा मग बंद केला जातो. भाविकांची अशी श्रध्दा आहे की भगवान शंकर पार्वती येथे येऊन सारीपाट खेळून जातात. दुस-या दिवशी पहाटे आरतीसाठी दरवाजे उघडतात.
श्री देव वीरभद्र मंदिर
दक्षाने पार्वतीची आणि शिवाची निर्भत्सना करणारे शब्द उच्चारले. ते सहन न झाल्याने सतीने योगाग्नी प्रज्वलित करुन यज्ञकुंडात देहत्याग केला. शिवाला हि बातमी कळताच त्याचा राग अनावर झाला. त्याने आपल्या जटा जमिनीवर आपटल्या व त्यातून वीरभद्राची उत्पत्ती झाली. वीरभद्र चांगुलपणाचे रुप आहे. वीरभद्र म्हणजे उग्रपणा आपल्या भल्यासाठी आहे. शिवाने आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी निवडलेला अवतार म्हणजे वीरभद्र. या देवाची उपासना केल्याने त्रास, आजारांपासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्य मिळते अशी भाविकांची श्रध्दा आहे.
श्री देव कामेश्वर मंदिर
श्री देव कामेश्वर हे मंदिर गायीच्या राखणदाराने त्याच्या हातून शिवलिंग भंग झाले याला आपणच कारणीभूत आहोत या प्रायश्चित भावनेने बांधले आहे. राखणदेवाचे प्रतिक म्हणून ते ओळखले जाते. एखादी गाय किंवा म्हैस हरवल्यास किंवा आजारी पडल्यास तसेच दूध देत नसल्यास ह्या मंदिरात प्रार्थना अगर नवस केल्यास पूर्ण होतो अशी भाविकांची श्रध्दा आहे. गावात जर पाउस पडला नाही तर पिंडीवर मंत्रपुष्पांजलीत जलाभिषेक करुन संपूर्ण पिंड पाण्यामध्ये ठेवली तर हमखास पर्जन्यवृष्टी होते अशी भाविकांची दृढ श्रध्दा आहे.
श्री देव दत्त मंदिर
श्री देव दत्त मंदिर हे पुरातन मंदिर असून दोन वेळा नदीच्या महापूरात वाहून गेले. दोन वेळा त्याची पुर्नबांधणी केली गेली. 2000 साली श्री वासुदेवानंद सरस्वती यांचे भक्त श्री सदानंद ताटके (बाबा गिरगाव) यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मंदिराचा जीर्णोद्धार केला. रोज दत्त महाराज भस्म धारणेसाठी या मंदिरात येतात असे मानले जाते.
गोपूर
गोपूराची मूळ इमारत हि पेशवेकाळात उभारली होती व त्याची शैली ही पेशवेकालीन वाडा शैली सारखीच होती. त्यावेळच्या इमारतीचा आराखडा करताना उपयुक्तता हा महत्वाचा निकष होता असे ठळकपणे जाणवत होते. रुंद जांभ्या चीऱ्यांच्या भिंतीमुळे इमारतीच्या आतील वातावरण उन्हाळयात थंड व थंडीत उबदार असायचे. इमारतीला बाहेरुन दगडी जिना होता. पहिला मजला हा लाकडी भाले व बडोद यांची सांधजोड करुन त्यावर फळ्याअंथरुण त्यावर मातीची जमीन केलेली होती. गवाक्ष ही जमिनीपासून थोडीशी वर असायची जेणेकरुन भारतीय बैठक मारुन बसले तरी बाहेरील सर्व दिसायचे. खिडकीला बाहेरुन महिरपी कमान होत्या. इमारतीचे छप्पर हे लाकडी सामान वापरुन मंगलोरी कौलांचे होते. इमारतीचा बाह्यआकाराची ठेवण ही सौदर्याचा विचार केलेली होती व आज पुर्नबांधणी करताना मूळ वास्तूचा विचार करुन ती पेशवेकालीन शैली जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला आहे.